६०० मृतदेह गोठविले ! काय आहे क्रायोनिक्स तंत्रज्ञान जाणून घ्या

मुंबई चौफेर टेक I २ डिसेंबर २०२२ I जगभरात रोज नवनवीन गोष्टींवर संशोधन होत आहे. या संशोधनाचे निष्कर्ष सामान्य व्यक्तींनाच नव्हे, तर शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित करत असतात.
विज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे; पण विकासाच्या वाटेवर अजून तितकी प्रगती झालेली नाही की मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करता येईल. या गोष्टीवर विज्ञानही आपला पराभव स्वीकारतं. अर्थात, ही गोष्ट सध्या अशक्य वाटत असली तरी एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा जिवंत करता येईल, असा दावा काही कंपन्या करत आहेत. त्यासाठी मृतदेह दीर्घ काळ गोठवावे म्हणजेच फ्रीज करावे लागतील.

या तंत्राला क्रायोनिक्स असं नाव देण्यात आलं आहे. मृत्यू झालेल्या व्यक्ती केवळ बेशुद्ध पडल्या आहेत, असं शास्त्रज्ञांचं मत आहे. क्रायोनिक्स तंत्राच्या मदतीने मृतांना पुन्हा जिवंत करता येऊ शकतं, असा दावा काही जणांनी केला आहे. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती पुन्हा जिवंत होईल या अपेक्षेने तिचा मृतदेह गोठवून सुरक्षित ठेवण्याकडे झपाट्याने कल वाढत आहे.

आतापर्यंत जगभरातल्या 600 जणांचे मृतदेह क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे फ्रीज केले गेले आहेत. अमेरिका आणि रशियामध्ये सर्वाधिक 300 जणांचे मृतदेह गोठवले गेले आहेत. जगभरातले अनेक नागरिक अखेरची इच्छा म्हणून आपलं शरीर क्रायोनिक्स तंत्रज्ञानाद्वारे सुरक्षित ठेवावं, असं त्यांच्या कुटुंबीयांना सांगत आहेत.