इन्स्टाग्रामवरच्या डिलिटेड पोस्ट्सही होणार रिकव्हर
मुंबई चौफेर टेक I २७ डिसेंबर २०२२ I सोशल मीडिया हा आजच्या युगाचा श्वास आहे असं म्हटलं तरी फारशी अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण ज्या व्यक्ती सोशल मीडियावर आहेत, त्यांना त्यावाचून करमत नाही.
त्यामुळेच प्रत्येक पोस्ट केल्यानंतर तिला किती लाइक्स आणि शेअर्स मिळाले हे वेळोवेळी पाहिलं जातं. पोस्ट डिलीट केली, तर ती परत मिळत नाही; पण ही बाब इन्स्टाग्रामच्या बाबतीत मात्र पूर्णतः खरी नाही. कारण इन्स्टाग्रामवरून डिलीट केलेली पोस्ट काही दिवसांपर्यंत पुन्हा रिकव्हर करणं शक्य असतं. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ या.
इन्स्टाग्राम हा जगातल्या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्याचा उपयोग फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी केला जातो. त्याव्यतिरिक्त स्टोरीज आणि रील्सही यावर शेअर करता येतात. काही वेळा काही युझर्स फोटो, व्हिडिओ किंवा रील डिलीट करतात.
डिलीट केलेली पोस्ट नंतर हवी झाली तर साहजिकच समस्या उद्भवते. अशा वेळी इन्स्टाग्राम युझर्सना विशेष फीचर उपलब्ध आहे. इन्स्टाग्रामवरून डिलीट केलेला कंटेंट रिकव्हर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोणताही कंटेंट इन्स्टाग्रामवरून डिलीट केला, की तो अकाउंटवरून तातडीने हटवला जातो; मात्र तिथून तो कंटेंट रिसेंटली डिलिटेड फोल्डरमध्ये जातो.
तिथे तो कंटेंट तब्बल 30 दिवस म्हणजेच महिनाभर उपलब्ध असतो. त्यानंतर तो कंटेंट कायमस्वरूपी डिलीट होतो. तसंच, इन्स्टाग्राम स्टोरी डिलीट केली, तर ती 24 तासांपर्यंत स्टोरी अर्काइव्हमध्ये राहते. त्यानंतर ती कायमस्वरूपी डिलीट होते.
याचाच अर्थ असा, की डिलीट केलेला कंटेंट या कालावधीत रिकव्हर करता येतो. अँड्रॉइड आणि आयफोनवर हा कंटेंट रिकव्हर कसा करायचा, याबद्दल माहिती घेऊ या. अर्थात हे तंत्र केवळ फोटो, व्हिडिओ अशा मीडिया फाइल्ससाठीच उपयुक्त ठरतं. इन्स्टाग्रामवरून डिलीट करण्यात आलेला मेसेज पुन्हा रिकव्हर करता येत नाही.