ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी सरकार उचलतेय मोठे पाऊल

मुंबई चौफेर टेक I २८ नोव्हेंबर २०२२ I ऑनलाइन फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. मोबाईल कॉलिंगमुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. फसवणूक करणारे कॉलिंगद्वारे लोकांची फसवणूक करत आहेत.

अशा बनावट नंबरवरून कॉल केला जातो की, तो ओळखणे खूप कठीण जाते. मात्र याला आळा घालण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलणार आहे.

सरकार मोबाईल कॉलिंगमध्ये मोठे बदल करणार आहे. यामुळे ऑनलाइन फसवणुकीला आळा बसेल आणि बनावट नंबर सुद्धा गायब होतील. सरकार आता ट्रायसोबत (TRAI) एक नवीन प्रणाली तयार करणार आहे. कॉल करणाऱ्यांचा मोबाईल नंबरसह त्याचा फोटोही दिसेल. यासाठी सरकार केवायसी (KYC) प्रणाली लागू करणार आहे. यासाठी दोन व्यवस्था लागू राहतील. पहिले आधार कार्ड आधारित आणि दुसरे सिम कार्ड आधारित.

आधार कार्ड आधारित
नवीन प्रणालीनुसार सर्व क्रमांक आधार कार्डशी लिंक केले जातील. अंमलबजावणीनंतर, एखाद्या व्यक्तीने कॉल करताच, मोबाईल क्रमांकासह नाव देखील दिसून येईल. आधार कार्डमध्ये जे नाव असेल तेच नाव दिसेल. दरम्यान, Truecaller अॅपमध्ये काही गोष्टी थोड्या वेगळ्या आहेत. या अॅपमध्ये युजर्सने स्वतः टाकलेल केलेले नाव दर्शविले आहे. पण, सरकारच्या या नवीन प्रणालीमध्ये तेच नाव दिसेल, जे आधार कार्डवर असणार आहे.

सिम कार्ड आधारित
नवीन सिम घेताना तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागतील, त्या आधारे कॉलिंगसोबत लोकांचे फोटो अटॅच केले जातील. अशा परिस्थितीत बनावट कॉलिंग ओळखणे सोपे होईल. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, कॉल करताना तो फोटो दिसून येईल. जो तुम्ही सिम खरेदी करताना काढला होता.

काय होईल फायदा?
ही प्रणाली कार्यान्वित होताच कॉल रिसिव्हरला कळेल की त्यांना कोण कॉल करत आहे. कॉल करणारा व्यक्ती आपली वैयक्तिक माहिती लपवू शकणार नाही आणि फसवणूकीला आळा बसू शकतो.