ब्ल्यूबगिंगपासून मोबाईलला धोका ; असे करा उपाय
मुंबई चौफेर टेक I ३० नोव्हेंबर २०२२ I दोन फोनमध्ये शेअरिंगसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या डिव्हाईसला लिंक करण्यासाठी ब्ल्यूटूथचा प्रामुख्यानं वापर केला जातो.
मात्र फोनमधील हे फीचर नेहमी चालू ठेवणं किंवा डिस्कव्हरी मोडवर ठेवणं धोकादायक ठरू शकतं. यामुळे हॅकर्स तुमच्या मोबाईलचा ताबा घेऊन त्यातली माहिती मिळवू शकतात. त्याला ब्ल्यूबगिंग असं म्हणतात. या ब्ल्यूबगिंगपासून मोबाईलला कसा धोका असतो व त्यापासून सुरक्षित कसं राहावं हे वाचा .
मोबाईलमधील हॉटस्पॉट, वाय-फाय तसंच ब्ल्यूटूथ ही फिचर्स दुसऱ्या डिव्हाईस किंवा नेटवकसोबत शेअरिंगसाठी तयार केलेली असतात. त्यांचा वापर करताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. नाहीतर तुमचा मोबाईल हॅक होण्याचा धोका असतो. ब्ल्यूबगिंग हा असाच एक हॅकिंगचा प्रकार आहे.
यात हॅकर्स तुमचा मोबाईल हॅक करून त्यातली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात. ब्ल्यूटूथ कनेक्शनमार्फत हे हॅकिंग केलं जातं. तुमच्या मोबाईलचा पासवर्ड किंवा इतर माहिती चोरण्याचा प्रयत्न हॅकर्स करतात. त्यासाठी ब्ल्यूटूथ कनेक्शनच्या माध्यमातून मोबाईलपर्यंत पोहोचतात.
मग त्यात मालवेअर इन्स्टॉल करतात व मोबाईलचा ताबा मिळवतात. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही काय करता हे त्यांना कळू शकतं. इतकंच नाही, तर तुमचं फोनवरचं बोलणंही ते ऐकू शकतात. फोनमधले मेसेज ते वाचू शकतात.