अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रात पडणार नोकऱ्यांचा पाऊस

मुंबई चौफेर टेक I २९ डिसेंबर २०२२ I आपण बघतो आपल्या आजूबाजूला काहीजण (Career) दिवसातील कितीतरी तास स्मार्टफोन बघण्यात आणि गेम खेळण्यात व्यस्त असतात. विद्यार्थी आणि बेरोजगार व्यक्ती तर आजकाल गेमिंगमध्ये जास्तच व्यस्त असतात.

भारतामध्ये गेमिंग करणाऱ्या लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे. याच गेमिंगचा उपयोग करून भविष्यात अनेकजण नोकरी मिळवू शकतात. 2023 या आर्थिक वर्षामध्ये देशातील गेमिंग इंडस्ट्रीसह इतर AVC म्हणजेच अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, कॉमिक्स या सेक्टरमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील आठ वर्षांचा विचार केला तर, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग, कॉमिक्स म्हणजेच AVCG क्षेत्रात सुमारे 20 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. खुद्द केंद्र सरकारनेच याबाबत दावा केला आहे. भारत सरकारनं स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या अहवालात, हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळेच सरकार आता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये या क्षेत्रांशी संबंधित नवीन अभ्यासक्रम आणणार आहे.

सरकारचं नियोजन आणि ताज्या अहवालावरून हे स्पष्ट झालं आहे की, ज्या व्हिडिओ गेम्स आणि कार्टूनपासून पालक आपल्या मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत (Career) आहेत. त्याच गोष्टी आता शाळांमध्ये शिकवल्या जाणार आहेत. एवढंच नाही तर या क्षेत्रांमध्ये कंटेंट तयार करणाऱ्यांनाही सरकार तांत्रिक आणि आर्थिक मदत करणार आहे.

सरकारच्या इंटर-मिनिस्ट्रिअल टास्क फोर्सचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा माध्यमांशी बोलताना म्हणाले, “सध्या भारतात AVCG क्षेत्रात सुमारे 1.85 लाख प्रोफेशनल्स आहेत. पण, मार्केटमध्ये यापेक्षा अधिक कुशल मनुष्यबळाची गरज आहे. या क्षेत्राचा विकास टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 2030 पर्यंत 20 लाख (Career) प्रोफेशनल्सची आवश्यकता असेल. संपूर्ण जगात AVCG क्षेत्राची बाजारपेठ सुमारे 22.78 लाख कोटी रुपयांची आहे. सध्या यामध्ये भारताचा वाटा 24 हजार 855 कोटी रुपयांचा आहे.”

केंद्राच्या टास्क फोर्सनं आपल्या अहवालात अनेक शिफारसी केल्या आहेत. फोर्सचे अध्यक्ष चंद्रा यांनी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना हा अहवाल सादर केला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकारनं या शिफारसी लवकरात लवकर लागू करण्याचा मानस व्यक्त केला आहे.